पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री

भारतीय सुपरक्रॉस रेसिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील पुनित बालन ग्रुपने (पीबीजी) जागतिक मोटरस्पोर्ट ब्रँड डुकाटीशी हातमिळवणी केली आहे.
पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री
पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री
Published on: 

पुणे : भारतीय सुपरक्रॉस रेसिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील पुनित बालन ग्रुपने (पीबीजी) जागतिक मोटरस्पोर्ट ब्रँड डुकाटीशी हातमिळवणी केली आहे. भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) तिसऱ्या हंगामासाठी ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’ या नव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. उद्योजक पुनित बालन आणि मोटरस्पोर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ प्रणव बाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या भागीदारीत डुकाटी प्रमुख प्रायोजक म्हणून सहभागी झाली असून, प्रणव बाकरे संघाचे सहमालक असतील. पीबीजीचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव, बाकरे यांचे मोटरस्पोर्टमधील कौशल्य आणि डुकाटीची जागतिक रेसिंग परंपरा यांचा संगम या संघाच्या माध्यमातून साधण्यात आला आहे. डुकाटीने आयएसआरएलच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेत कालिकत येथे ‘डेस्मो ४५० एमएक्स’ ही ऑफ-रोड बाईक सादर केली होती. आता ही बाईक प्रत्यक्ष स्पर्धेत उतरणार असून, नव्याने सादर झालेली ‘डेस्मो २५० एमएक्स’देखील तिसऱ्या हंगामात सहभागी होणार आहे. त्यामुळे या बाइक्सना अन्य संघांच्या रायडर्सशी थेट स्पर्धा करण्याची संधी मिळेल.

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा यांनी सांगितले की, भारतीय रेसिंग क्षेत्रात डुकाटीची क्षमता दाखविण्यासाठी आयएसआरएल हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. नव्या पिढीतील रायडर्सना प्रेरणा देण्यासाठी कंपनी या भागीदारीसाठी कटिबद्ध आहे.

प्रणव बाकरे यांनी संघाच्या तयारीसाठी दर्जेदार बाइक्स, नियोजन आणि सक्षम संघव्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर

भारतीय रेसिंगमधील उत्साह, कामगिरी आणि क्रीडाभावना प्रतिबिंबित करणारा संघ उभारण्याच्या उद्देशाने आम्ही आयएसआरएलमध्ये सहभागी झालो आहोत. प्रणव बाकरे यांचा सहभाग आणि डुकाटीची साथ यामुळे आमच्या उद्दिष्टांना बळ मिळेल. स्पर्धात्मक संघ उभारणे, तरुण खेळाडूंना पाठबळ देणे आणि चाहत्यांना अभिमान वाटेल अशी संघाची ओळख निर्माण करणे, यावर आमचा भर असेल, असे पुनित बालन, अध्यक्ष, पुनित बालन ग्रुप आणि सहमालक, पीबीजी डुकाटी रेसिंग यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in