

पेण : पेण नगरपरिषद येथील इंडोअर गेम हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी ठेवलेल्या १ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या ब्रास पंचधातूच्या वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विलास चव्हाण (२१) आणि राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी (३७) या दोघांचा समावेश असून ते आयटीआय कॉलेजच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सध्या पेण नगरपालिकेच्या इंडोअर गेम हॉलमध्ये सुरू आहे. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या ब्रास पंचधातूच्या वस्तू पहाटेच्या सुमारास गोडाऊनमधील उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून अज्ञात इसमाने चोरी करून नेल्या होत्या. या प्रकरणी चिंचपाडा येथील फिर्यादीने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाने सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी विलास चव्हाण व राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी तसेच त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने सदर चोरीसह यापूर्वीही चोरी केल्याची कबुली दिली असून, चोरी गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.