पेण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पेणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील कार्यकाळात पेण नगर परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपसमोर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नव्या भागीदाराच्या रूपाने उभी राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक पातळीवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी युतीबाबत स्पष्ट नाराजी दाखविल्याने दोन्ही पक्षांत संभ्रम वाढला आहे.
युतीचा निर्णय प्रलंबित असल्याने दोन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पेणमध्ये शिवसेना (शिंदे गट) प्रभावी नसल्याने महायुतीतील तिसरा घटक या समीकरणातून मागे पडल्याचे दिसते.
माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’च्या पहिल्या १० उमेदवारांची घोषणा केल्यानंतर पेणमधील निवडणुकीला नवे समीकरण मिळाले आहे. काही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार या आघाडीच्या संपर्कात असल्याचे वर्तुळात चर्चेत आहे. त्यामुळे युतीपेक्षा स्वतंत्र लढाईकडे राष्ट्रवादी झुकत असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने भाजपकडून प्रीतम ललित पाटील यांचे नाव आधीच समोर आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसुधा तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोन वेगवेगळ्या दाव्यांमुळे महायुतीतील समन्वय ढळल्याचे स्पष्ट दिसते.
राष्ट्रवादीकडे तब्बल २२ अर्ज दाखल झाले असून सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. पेण राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत २२ अर्ज आले असून प्रभाग १ ते १० मधून अनेकांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
पेणमधील इच्छुक उमेदवार
प्रभाग १ : अर्पिता कुंभार, निकित पाटील, प्रभाग २ : भूषण मनोरे, कोमल मनोरे, प्रभाग ३ : संजय म्हात्रे, रजनी वारकर, प्रभाग ५ : दीपक गुरव, पुष्कराज गुरव, भूषण कडू, प्रभाग ६ : आनंद जाधव, स्वाती म्हामणकर, प्रभाग ७ : वाहिद खोत, वैभव आवास्कर, मुस्कान झटाम, प्रभाग ९ : निवृत्ती पाटील, प्रभाग १० : मीनाक्षी पाटील आदींनी अर्ज दाखल केला आहे. या यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटपावर समाधानी नसून, पेण नगर परिषदेत सर्वच प्रभागांत उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
पेणमध्ये राजकीय उत्सुकता वाढली
महायुतीचा धर्म पाळत लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र होते. मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये अंतर्गत नाराजी, संभाव्य कटकारस्थान आणि उमेदवारीत झालेल्या गोंधळामुळे युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेण नगरपरिषद निवडणूक भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.