Pen : आम्ही पेणकर विकास आघाडीतील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

पेण (Pen) नगरपालिकेचे समीकरण बदलणार; शिशिर धारकर शिवसेनेत प्रवेश करणार?
Pen : आम्ही पेणकर विकास आघाडीतील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

सुमारे ६५ वर्षे पेण (Pen) नगरपालिकेवर एक हाती वर्चस्व असलेल्या धारकर गटाकडून पेन अर्बन बँक घोटाळा झाल्यावर नगर परिषदेची सत्ता आमदार रविशेठ पाटील यांच्याकडे म्हणजेच भाजपकडे गेली आहे. गेली १० वर्षे ही सत्ता रवीशेठ पाटील यांच्याकडेच आहे. मात्र पेण अर्बन बँकेमध्ये आर्थिक घोटाळा होऊनही पेण नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर यांना मानणारा असंख्य कार्यकर्त्यांचा गट आजही पेणमध्ये आहे. आगामी पेण नगरपालिकेच्या तसेच विधान परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिशिर धारकर यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीची स्थापना केली आहे.

आज आज शिशिर धारकर यांच्याच पेणमधील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश मोठ्या जल्लोषाल झाला. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये शिशिर धारकर यांचा करिष्मा पुन्हा चालेल का? आणि पेण नगरपालिकेचे समीकरण बदलणार का? अशी चर्चा पेणमध्ये ऐकण्यास मिळत आहे. आज माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशामध्ये शिशिर धारकर तसेच आम्ही पेणकर विकास आघाडीचा कुठे उल्लेख जरी झाला नसला तरीही पक्षप्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते नेते आजी-माजी नगरसेवक हे शिशिर धारकर यांनाच मानणारे आहेत त्यामुळे शिशिर धारकर हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का ? हा प्रश्न पेणमधील नागरिक आणि प्रस्थापितांना पडलेला असल्याचे दिसत आहे.

पेण नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत पेणचे विद्यमान नगरसेवक सुहास पाटील, भावना बांधणकर, माजी उपनगराध्यक्षा अरुणा पाटील, बृहन्मुंबईचे निवृत्त सहाय्यक अभियंता जीवन पाटील, असदअली अखंवारे, यांच्या बरोबर माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने प्रस्थापितांना जोरदार दणका दिला आहे. माजी उपनगराध्यक्षांसह, विद्यमान नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालींनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याने पेणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलणार आहे. पेण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच असा आत्मविश्वास माजी केंद्रीय अवघड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुढे बोलताना गीते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट असताना देखील राज्यात चांगले काम केले. त्यामुळे शिवसेना तळागाळातील नागरिकांच्या मनामध्ये रुजली आहे. याचीच भीती विरोधकांना असल्यामुळे सध्याचे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवसेंदिवस पुढे ढकलत आहे. भाजप व मिंदे गट शिवसेनेच्या नेत्यांना व शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना पक्ष संपणार नसून तो उंच भरारी घेणारा आहे. त्यामुळेच अनेक नेत्यांसह कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत. पेण मधील एवढ्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पेण नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि पेणचा आमदार हा शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, मुंबई आमदार विलास पोतनीस, संपर्कप्रमुख विष्णू पाटील, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, विधानसभा संघटक लहू पाटील, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, पेण तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख राजाराम पाटील, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, संतोष पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, संघटक राजेंद्र राऊत, साताऱ्याचे संजय चिटणीस, विभाग प्रमुख राजू पाटील, वाहतूक सेनेचे श्रीतेज कदम, दिलीप पाटील, अच्युत पाटील, युवा सेनेचे चेतन मोकल, विजय पाटील, ग्राहक संरक्षणचे नंदू मोकल, नरेश सोनवणे, गजानन मोकल, विशाल दोशी, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in