पेण तालुका भीषण दुष्काळाच्या संकटात? तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईकडे वळवण्यासाठी शासन व प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जमिनीखालून तब्बल १०५ मीटर खोलीवर जलबोगदे तयार करून हे पाणी नवी मुंबईकडे पोहोचवले जाणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात पेण तालुका भीषण दुष्काळाच्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पेण तालुका भीषण दुष्काळाच्या संकटात? तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
Published on

पेण : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईकडे वळवण्यासाठी शासन व प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जमिनीखालून तब्बल १०५ मीटर खोलीवर जलबोगदे तयार करून हे पाणी नवी मुंबईकडे पोहोचवले जाणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात पेण तालुका भीषण दुष्काळाच्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. समाजसेवक राजेंद्र झेमसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली.

हेटवणे धरण हे पेण तालुक्याच्या जीवनरेषा मानले जाते. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना दुबार पिकाची संधी, नागरिकांना पिण्याचे पाणी व तालुक्याला विकासाची दिशा मिळावी, या उद्देशाने माजी खासदार स्व. बॅ. ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून हा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता याच प्रकल्पाचे पाणी नवी मुंबईकडे वळवले जात असल्याने तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही, धरणात वर्षाअखेरीस फक्त ४६.४३ एमसीएम पाणी उरते. एवढ्या पाण्यावर संपूर्ण तालुका जगू कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उलट नवी मुंबई मात्र दररोज कोट्यवधी लिटर पाणीपुरवठा करून आपला विकास वेगाने करत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नावर मौन बाळगून आहेत, असा आरोप झेमसे यांनी केला. जलसंपदा विभागाची परवानगी न घेता सुरू असलेल्या जलबोगद्याच्या कामातही मोठा गैरव्यवहार असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. पाईपाचा व्यास नेमका किती आहे आणि भविष्यात उरलेले पाणीही सिडकोकडे वळवले जाणार नाही ना? याबाबतही नागरिकांमध्ये संशय वाढला आहे.

पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर हेटवणे सिंचन प्रकल्पासाठी राखीव सा शिक्का मारला गेला. मात्र प्रत्यक्षात त्यांना हक्काचे पाणी मिळालेच नाही. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठाही अपुरा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेणसाठी फक्त ३२ टक्के पाणी शिल्लक राहणार

सध्या हेटवणे धरणातून १५० एमएलडी पाणी सिडकोकडे जात असून २०२० मध्ये शासनाने आणखी १२० एमएलडीचा कोटा मंजूर केला. म्हणजेच एकूण २७० एमएलडी, म्हणजे दररोज २७ कोटी लिटर पाणी नवी मुंबईकडे जाणार आहे. वर्षभरात हे प्रमाण ९८.५५ एमसीएम इतके होते. धरणाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता १४४.९८ एमसीएम असल्याने तब्बल ६८ टक्के पाणी नवी मुंबईकडे वळवले जाणार आहे. अशा परिस्थितीत पेण तालुक्यासाठी फक्त ३२ टक्के पाणी शिल्लक राहणार आहे.

आंदोलनाचा इशारा

आता जनतेची मागणी एकच, सिडकोला दिलेला अतिरिक्त १२० एमएलडीचा कोटा तात्काळ रद्द करावा. तसेच शासनाने मंजूर केलेल्या ७६६ कोटी रुपयांच्या कामाला गती देऊन शेतकऱ्यांना दुबार पिकासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा पेण तालुक्याची जनता निर्णायक आंदोलन छेडेल.

logo
marathi.freepressjournal.in