पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण ; संतप्त ठेवेदारांनी अकार्यक्षम प्रशासन व घोटाळेबाजांचे श्राद्ध घातले

मागील बारा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या पाचशेहून अधिक ठेवीदारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली
पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण ;  संतप्त ठेवेदारांनी अकार्यक्षम प्रशासन व घोटाळेबाजांचे श्राद्ध घातले

दि पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सुमारे दोन लाख ठेवीदारांना बारा वर्षानंतर ही न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी अकार्यक्षम प्रशासन व बँकेत कोट्यावधीचा घोटाळा करणाऱ्यांचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला आहे.      

ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, निषेध असो निषेध असो बँक बुडव्यांचा निषेध असो, बँक बुडवणाऱ्या धारकरचा निषेध असो, मिळालाच पाहिजेत मिळालाच पाहिजेत आमच्या कष्टाच्या ठेवींची रक्कम आम्हाला मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी पेण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी संतप्त ठेवीदारांनी बँक बँक बुडविणाऱ्यांचे श्राद्ध घालून व कार्यक्षम प्रशासनाचा निषेध केला. तसेच मागील बारा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या पाचशेहून अधिक ठेवीदारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव म्हणाले की, पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्याबाजांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यवहार सुरू आहेत. रोडे काश्मिरे येथील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत तर पेण शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नारायणी बिल्डिंग मधील व्यापारी गाळे व निवासी गाड्यांचे व्यवहार बेकायदेशीर रित्या झाले आहेत. या संदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार लेखी पत्र व्यवहार करूनही त्यांनी बघायची भूमिका घेतल्याने ठेवीदारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मागील बारा वर्षात ठेवीदारांनी अनेक आंदोलने केली. न्यायालयात व प्रशासकीय कार्यालयांमध्ये न्यायालयीन लढाई लढली. परंतु आरोपींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साठे-लोटे साधल्याने अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही असा आरोप जाधव यांनी यावेळी केला.       

अन्यथा ठेवीदार आत्मदहन करणार

बारा वर्षात न्याय न मिळाल्याने संतप्त झालेले ठेवेदार जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालयात जाऊन आत्मदहन करतील असा इशारा नरेन जाधव यांनी यावेळी दिला.     या आंदोलनात संघर्ष संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, गजानन गायकर, दिलीप दुबे, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक अजय शिरसागर, विभावरी भावे, नामदेव कासार, अंकिता पोटे, कुंदा खरे, मनोहर पाटील, मोहन वेखंडे, बाळकृष्ण कमळकर, सुहासिनी कदम यांच्यासह ठेवीदार व जेष्ठ नागरिक सामील झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in