पुण्यात ‘पीएफआय’च्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; संतापाची लाट उसळली

रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटले आहे
पुण्यात ‘पीएफआय’च्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; संतापाची लाट उसळली

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर संघटनेच्या समर्थक कायर्कर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत. दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र हे आरोप नाकारले आहेत. त्याचप्रमाणे रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यात दहशदवाद विरोधी पथक (एटीएस) आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यानी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशाविरोधात आणि समाज विघातक कारवाया केल्याच्या संशयावरून देशातील १२ राज्यांत राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत १००पेक्षा अधिक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरीनगर कोंढवा खुर्द, पुणे) यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगण, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित नऊ जणांना ताब्यात घेतले. तर तेलंगण आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरुवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर, अल्लाह-हू-अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार नितेश राणे आणि राम सातपुते यांनी ट्विट करत हा आरोप केला; मात्र पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याप्रकरणी एक व्हिडीओ ट्विट करत थेट आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘‘पुण्यात ‘पीएफआय’च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये. कठोर कारवाई करावी.” भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील ट्विट करत तसेच व्हिडीओ जारी करत आरोप केले आहेत. राणे म्हणाले, “ ‘पीएफआय’च्या समर्थनार्थ काही नालायकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले. हे लोक विसरले असतील की, आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. देशाच्या विरोधी कोणीही अशाप्रकारचे नारे देत असतील तर अशा पद्धतीच्या देशद्रोह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हे पोलीस खात्याने लक्षात ठेवावे. या लोकांना तत्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी. अशाप्रकारची हिंमत पुन्हा कोणाकडून होता कामा नये,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

योग्य ती कारवाई करू - मुख्यमंत्री शिंदे

“पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले, त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच; पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत,” असा कडक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

शोधून काढू, सोडणार नाही - फडणवीस

“पाकिस्तान जिंदाबादची घोषणा जर कोणी महाराष्ट्रात अथवा भारतात देणार असेल, तर त्याला सोडणार नाही. जिथे असेल तिथे शोधून कारवाई करू,” असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in