

कराड : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत शनिवारी सायंकाळी फलटण शहरातील गजानन चौकात कँडल मार्च काढून डॉक्टर पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कँडल मार्चचे आयोजन राष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे आणि अमीर शेख यांनी केले होते. या वेळी सचिन काकडे, सनी काकडे, महादेव बापूराव शिंदे, माऊली गायकवाड, विजय शिंदे, प्रतिभा शिंदे, माऊली सावंत, अमोल रासकर, मंगेश आवळे, विक्रम शितोळे, गिरीश बनकर, युवराज शिंदे, राहुल निंबाळकर, जॉनी इंगवले, रेश्मा कामरान पठाण, राणी भोसले, विजय जाधव, यास्मीन बागवान यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
दिवाळीसारख्या सणाच्या काळात घडलेली ही हृदयद्रावक घटना फलटणच्या इतिहासावर काळिमा फासणारी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. एका हुशार, धाडसी आणि उमद्या डॉक्टर युवतीवर आत्महत्येची वेळ येणे ही समाजाची शोकांतिका असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या वेळी शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी पीडित डॉक्टर युवतीला जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहत तिच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.