फांगुळगव्हाण पुलाचा प्रश्न सुटला...! जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला न्याय, नवीन पुलासाठी ६० लाखांचा निधी मंजूर

मुरबाडमधील स्थानिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुलासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
फांगुळगव्हाण पुलाचा प्रश्न सुटला.
फांगुळगव्हाण पुलाचा प्रश्न सुटला.
Published on

मुरबाड : मुरबाडमधील अतिदुर्गम भागातील फांगुळगव्हाण परिसरातील मुरबाड, मोरोशी, फांगुळगव्हाण येथील मोरोशी आश्रम शाळेतील ८० शालेय विद्यार्थ्यांनी आणि मुरबाड गावकऱ्यांनी एकत्र येत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात दगडाचे बुरूज उभे करून तात्पुरता लाकडाचा पूल उभा करून आपला मार्ग स्वत:हून निर्माण केला. याबाबतचे वृत्त दै. ‘नवशक्ति’मध्ये दि. ७ ऑगस्ट रोजी माळशेज घाटातील लाकडी पुलाची चर्चा या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. याची दखल कोणत्याही राजकीय नेत्याने न घेता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घेत येथील या धोकादायक प्रवासातून विद्यार्थ्यांची आणि गावकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुरबाडमधील स्थानिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुलासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे स्थानिकांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आभार मानले आहे.

मुरबाड फांगुळगव्हाण नाल्यावर उभारण्यात आलेल्या लाकडी पुलाच्या माध्यमातून येथील आदिवासी विद्यार्थी तसेच नागरिक दरारोज आपला जीव धोक्यात घालून येजा करीत असतात. भर पावसात या पुलावरून प्रवास करणे त्रासदायक असताना देखील शिक्षण आणि रोजंदारीसाठी येथील विद्यार्थी आणि नागरिक हा त्रास सहन करत असल्याचे चित्र नेहमी पहावयास मिळत असे.

८ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत येथील पुलासाठी ६० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या पुलामुळे आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कायमची सुटका केली आहे.

मुरबाड येथील फांगुळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले आहे. येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. काही दिवसांपूर्वी फांगुळगव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर बुरूज उभे करून तात्पुरता लाकडाचा पूल उभारला होता. या पुलाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यी, नागरिक पावसाळ्यात येजा करत असत. याप्रकरणी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविमर्श करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पुलासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या पुलाचे काम सुरू होणार असून या पुलामुळे स्थानिक आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेपूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सूचना दिल्या आहेत.

एखाद्या अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने काम केल्यानंतर त्याच्या हातून लोकसेवक म्हणून किती चांगले काम होवू शकते, याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. मात्र पुलाचे श्रय घेण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे चित्र देखील पहावयास मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in