
मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये फणसाड अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यात पशू-पक्षी व वन्यजीव यांची मोठी संख्या आहे. सोमवारी दिनांक १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने प्रखर अशा चंद्र प्रकाशामध्ये वन्यजीवांची गणना करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रत्येक अभयारण्यात बुद्ध पौर्णिमानिमित्ताने वन्यजीवांची गणना केली जाते. कारण बुद्ध पौर्णिमेस चंद्र प्रकाश प्रखर असल्यामुळे गणना करण्यासाठी त्याची मदत होते. दिनांक १२ व १३ मेपर्यंत वन्यजीवांची गणना करण्यात येणार आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळी फणसाड अभयारण्यामधील सर्व कर्मचारी वृंद व वन्यजीव प्रेमी नागरिक यांच्या मदतीने ही गणना केली जाणार असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी दिली आहे.
गणनेसाठी ट्रॅप कॅमेऱ्याची मदत सुद्धा होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. गणना मोहीम यशस्वी होण्यासाठी फणसाड अभयारण्यातील वनपाल आदेश पोकळ, अरुण पाटील, संतोष पिंगळा, सुनील जाधव हे अथक परिश्रम घेत आहेत.
सात मचाणांची उभारणी
वन्यजीवांची गणना करण्यासाठी झाडाच्या उंच ठिकाणी सात मचाण बांधण्यात आलेले आहेत. फणसाड अभयारण्यात पाण्याचे २७ स्त्रोत असून जिथे वन्यजीव पाणी पिण्यास येतात, अशा ठिकाणी मचाण व अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळच्या दरम्यान सर्व पथके घनदाट जंगलात गणनेच्या कामाची सुरुवात करणार आहेत.
११७ विविध पक्षांच्या जाती
या अभयारण्यात रान गवे, बिबट्या, सांबर, भेकर, रान डुक्कर, शेकरू, पिसोरी, ससा, रान कुत्रे असे विविध वन्यजीव त्याचप्रमाणे ११७ विविध पक्षांच्या जाती आढळतात. त्याचप्रमाणे विविध रंगीबेरंगी फुलपाखरे या अभयारण्याची शोभा वाढवतात. फणसाड अभयारण्य हे नवाब कालीन संरक्षित वन क्षेत्र आहे. येथे उंच उंच झाडे व मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतो. विविध औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात.