पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागेल; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागेल; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागेल; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागू होईल, असा दावा भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
Published on

पुणे : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागू होईल, असा दावा भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्यांनी सांगितले की, इतर पक्षातील शहरातील जे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत, त्यांच्या नावावर प्रथम स्थानिक गाभा समिती (कोअर कमिटी) एकमत करतील. समितीने एकमत केलेली नावे पुढे प्रदेशकडे पाठवली जातील. नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी गुरुवारी पिंपळेसौदागर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, प्रदेश सचिव राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, शहर सरचिटणीस विकास डोळस, युवक अध्यक्ष दिनेश यादव आदी उपस्थित होते. बैठकीत अर्ज व उमेदवारी निश्चितीबाबत चर्चा झाली.

मंत्री पाटील म्हणाले, “२० किंवा २२ डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल. आजपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज दिले जातील. पुढील चार दिवस अर्ज भरले जातील. अर्ज देण्यासाठी कोणतेही शक्तीप्रदर्शन करायचे नाही; स्वतः इच्छुकाने पक्ष कार्यालयात येऊन अर्ज द्यावा. अर्जांची छाननी केली जाईल आणि ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवली जाईल.

उमेदवारांची निवड खासगी संस्थेद्वारे

उमेदवारांची निवड एका खासगी संस्थेद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व्हेच्या आधारे केली जाईल. अर्जानुसार प्रत्येकाचा सर्व्हे केला जाईल. सर्व्हेचा निकाल उमेदवारी ठरवण्यासाठी आधार म्हणून घेतला जाईल, पूर्णपणे त्यावर निर्णय होणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मतदेखील घेतले जाईल. सर्व्हे व पदाधिकाऱ्यांचे मत ९० ठिकाणी जुळले, तर प्रदेश नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही. अंतिम मान्यता प्रदेशकडून दिली जाईल आणि उमेदवार निश्चित होताच जाहीर केले जातील.

logo
marathi.freepressjournal.in