Kudal : पाझर तलावावर 'संकट'; तलाव, पर्यावरण आणि रस्त्याच्या संरक्षणासाठी पिंगुळीतील ग्रामस्थांचा एल्गार

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या देऊळवाडी येथील पाझर तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तलावालगत २७५ बंगल्यांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने तलावाचे पाणी, नैसर्गिक पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक रस्त्याच्या वापरावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
Kudal : पाझर तलावावर 'संकट'; तलाव, पर्यावरण आणि रस्त्याच्या संरक्षणासाठी पिंगुळीतील ग्रामस्थांचा एल्गार
Kudal : पाझर तलावावर 'संकट'; तलाव, पर्यावरण आणि रस्त्याच्या संरक्षणासाठी पिंगुळीतील ग्रामस्थांचा एल्गारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या देऊळवाडी येथील पाझर तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तलावालगत २७५ बंगल्यांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने तलावाचे पाणी, नैसर्गिक पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक रस्त्याच्या वापरावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पाच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ पासून कुडाळ येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तलावानजीक बाहेरील विकासकांनी जमीन संपादित केली असून, तेथे २७५ बंगल्यांचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या परिसरातील जमिनीचे सपाटीकरण, मातीचे रस्ते तयार करणे आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याचे दृश्यचित्रांमधून दिसत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

पिंगुळीतील ग्रामस्थांसाठी हा पाझर तलाव महत्त्वाचा जलस्रोत आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित प्रकल्पातील सांडपाणी, बांधकामातील गाळ आणि अन्य प्रदूषक तलावात मिसळणार नाहीत, याची खात्री कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तलावाचे पाणी दूषित झाल्यास त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

तलावाच्या बाजूने अनेक वर्षांपासून वापरात असलेला

पारंपरिक रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. हा रस्ता बंद करताना कोणाची परवानगी घेण्यात आली,ग्रामस्थांच्या येण्या-जाण्याच्या हक्कांचा विचार करण्यात आला आहे का? असे प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तलाव परिसरातील झाडांची तोड आणि जमिनीतील बदलांमुळे पाण्याची नैसर्गिक साठवण आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकल्पाला मंजुरी देताना पर्यावरणीय बाबींचा विचार करण्यात आला आहे का, याचीही स्पष्टता मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

या प्रकल्प उभारणीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या, पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन, तलावाच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि संबंधित रस्त्याची कायदेशीर स्थिती याबाबत पारदर्शक चौकशी करण्यात यावी.

बेमुदत उपोषणाचा इशारा

हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा नाही; तो पिंगुळीच्या पाण्याचा, निसर्गाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. तलावाचे संरक्षण आणि आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. या आंदोलनात पिंगुळीतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in