
पुणे : पिंक ई-रिक्षांना पहिल्या टप्प्यात मिळणारा प्रतिसाद बघता, राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरू करण्यात येईल. तसेच मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात पवार बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बापुसाहेब पठारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, कायनेटिक ग्रीन कंपनीचे अध्यक्ष सुधांशू अग्रवाल, रितेश मंत्री आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्या वतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व सोलापूर या आठ शहराचा समावेश करण्यात आला आहे. पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे. या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच समाजातील स्थान बळकट करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.
महिला वर्गाच्या सुरक्षिततेकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. पिंक ई रिक्षा योजना समाजातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे; चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरीत्या चालविण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांची देखील काळजी घ्यावी. पिंक रिक्षा चालविणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्रेरणास्त्रोत ठरतील, अशा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
तटकरे म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना "पिंक ई- रिक्षा" वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान येत्या काळात पुणे येथे सुमारे एक हजारापेक्षा अधिक ई-वाहन चार्जिंग स्थानक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्य - केंद्र शासनाचे अनुदान
पिंक ई-रिक्षा योजनेकरिता २५ हजार रुपये केंद्रशासन आणि ७५ हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे, तर विविध बँकेच्या माध्यमातून ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.