मराठा आरक्षणाला आव्हान, हायकोर्टात याचिका; सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस - जरांगे

राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आव्हान दिले आहे.
मराठा आरक्षणाला आव्हान, हायकोर्टात याचिका; सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस - जरांगे

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाने सरकारकडे अहवाल सादर केला. या अहवालाबरोबरच न्या. शुक्रे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत ही नियुक्ती रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्याला स्थगिती द्या, अशी मागणी आव्हान याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाने तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांची नियुक्ती केली. या आयोगाने सरकारकडे अहवाल सादर केला. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या आरक्षणालाच अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.

सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने आरक्षणाचा कायदा केला. मुळात आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती शुक्रे यांची केलेली नेमणूक कायद्याला धरून नाही, असा दावा याचिकेत करताना याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्या आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून नोकरी व शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जाहिराती काढण्यावर निर्बंध घाला, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल होण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक विनोद पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले आहे.

निर्णय घटनात्मक रचनेला धक्का देणारा

राज्य सरकार व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा घाणेरड्या राजकारणाचा एक भाग असून हा निर्णय घटनात्मक रचनेला धक्का देणारा आहे. हा निर्णय घेताना योग्य प्रक्रियेचा अवलंब करण्यात आलेला नाही, असा आरोप ॲड. जयश्री पाटील व इतरांनी केला आहे.

सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस -जरांगे

राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आव्हान दिले आहे. सदावर्ते हा फडणवीस यांचाच माणूस आहे. फडणवीस एका बाजूने देतात, तर दुसऱ्या बाजूने घेतात, असा आरोप मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. फडणवीस यांची मराठ्यांवर खुन्नस असून ते मराठ्यांवर दडपशाही करत आहेत. अंतरवाली सराटी गावातील संचारबंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in