एसटी संपाने प्रवाशांचे हाल; गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांना फटका, एसटी संघटनेची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

गणेशोत्सवाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, राज्यभरातील एसटी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्याने सर्वसामान्यांना फटका बसू लागला आहे.
एसटी संपाने प्रवाशांचे हाल; गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांना फटका, एसटी संघटनेची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
Published on

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. गणेशोत्सवाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, राज्यभरातील एसटी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्याने सर्वसामान्यांना फटका बसू लागला आहे. मंगळवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांची एसटी कामगार कृती समितीसोबत झालेली बैठक फिस्कटल्याने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही, तर गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल होणार आहेत.

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील २५१ आगारांपैकी ५९ आगारे मंगळवारी पूर्णत: बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ७७ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती, तर ११५ आगारांमध्ये पूर्णत: वाहतूक सुरळीत सुरू होती. मंगळवारी २२३८९ नियोजित फेऱ्यांपैकी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ११९४३ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे ५० टक्के वाहतूक बंद होती. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून होणारी कोकणातील जादा वाहतूक मंगळवारी सुरळीत सुरू होती, मात्र बुधवारी उर्वरित एसटी कर्मचारी संघटना या संपात होणार असल्यामुळे एसटी सेवा पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभरात अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संघटनांनी संप केल्याने गावी जाणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल असताना चाकरमान्यांसमोर एसटीचा पर्याय होता. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांनीच संप पुकारल्यामुळे ‘जाए तो जाए कैसे’ हा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.

वेतनाशी निगडित आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात येत नसल्यामुळे एसटी कामगारांमध्ये गेले अनेक वर्षांपासून नाराजी आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबरोबरच मागील वेतनवाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी, अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने संपाचे हत्यात उगारले आहे. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारल्याने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ५९ आगार पूर्णत: बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असेच सुरू राहिल्यास गणेशोत्सव काळात राज्यभरातील गणेशभक्तांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वाहतूक सुरळीत

मुंबई विभागात सर्व आगारांतील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णत: बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही. तथापि, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागातील बहुतेक आगार बंद आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णत: बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णत: बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णत: बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार, तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णत: बंद आहेत.

गणेशोत्सवात संपावर जाणे कितपत योग्य? - सामंत

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत मंगळवारी दुपारी १२ वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात एसटी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. ऐन गणेशोत्सवात आंदोलन करून कोकणवासीयांचा प्रवास गैरसोयीचा करू नये, यासाठी कृती समितीला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सामंत यांनी केले. तसेच कृती समितीच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा पवित्रा संघटनांनी घेतला. त्यामुळे सामंत यांच्यासोबतची समितीची बैठक निष्फळ ठरली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नेहमी सकारात्मक होते, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे. गणेशोत्सव राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असताना, अशाप्रकारचे आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला.

चालक व कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी

संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी बुधवारपासून दीर्घकाळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रवाशांचे हाल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी विविध संघटनेच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. जवळपास ९६ बसेस जिल्ह्यातून बाहेर गेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. असंख्य प्रवासी यामुळे ताटकळले. एसटी बसेस रद्द झाल्याने असंख्य प्रवासी बस केव्हा सुरू होणार, म्हणून सकाळपासून एसटी स्थानकावर वाट पाहत बसले. अनेकांनी इतर वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. त्यामुळे खासगी वाहतुकीवरही भार वाढला होता.

प्रवाशांची गैरसोय करू नका !

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला बुधवारी सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी बोलावले आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होईल, अशाप्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

...तर संपकऱ्यांवर एफआयआर दाखल होणार

औद्योगिक न्यायालयाने मंगळवारचा अघोषित संप बेकायदेशीर ठरविला आहे. या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in