मोदींचा पवारांवर हल्लाबोल, रालोआ ४०० हून अधिक जागा जिंकेल; पंतप्रधानांना विश्वास

तत्कालीन संपुआ सरकारच्या २००४ ते २०१४ या कालावधीत शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते, मात्र ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यापूर्वीच मधल्या मध्येच हडपण्यात आल्याचा घणाघाती आरोप
मोदींचा पवारांवर हल्लाबोल, रालोआ ४०० हून अधिक जागा जिंकेल; पंतप्रधानांना विश्वास

यवतमाळ : तत्कालीन संपुआ सरकारच्या २००४ ते २०१४ या कालावधीत शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते, मात्र ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यापूर्वीच मधल्या मध्येच हडपण्यात आल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यवतमाळ येथील जाहीर सभेत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (शरदचंद्र पवार गट) यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

मोदी यांनी राज्यातील विशेषत: विदर्भातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांवरून काँग्रेसवर टीका केली. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी  देशात १०० कुटुंबापैकी केवळ १५ कुटुंबांकडेच पाइपद्वारे पाणीपुरवठा होत होता, असेही ते म्हणाले. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ ४००हून अधिक जागी विजयी होईल आणि पुढील पाच वर्षात देशात वेगाने विकास झालेला पाहावयास मिळेल, असेही मोदी या वेळी म्हणाले. मोदी यांनी या जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या 'चाय पे चर्चा' कार्यक्रमाचाही उल्लेख केला.

मोदींबरोबर या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

यावेळी मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी इंडिया आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते एकदा आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं. गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हतं. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबलं आणि बघता बघता पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचं सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहेचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. लोकांना १ रुपयातले केवळ १५ पैसे मिळायचे. आज काँग्रेसचं सरकार असतं तर जे २१ हजार कोटी रुपये आज शेतकऱ्यांना मिळाले आहेत, त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते आणि केवळ तीन हजार कोटी लोकांना मिळाले असते. परंतु, आता भाजपा सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळेल. पै-पै त्याच्या खात्यात पोहोचेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in