मुंबई/ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. मुंबईतील ही पहिलीच भूमिगत मेट्रो आहे. तसेच ठाण्यातील सुमारे १८ हजार ७६० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुख्य मेट्रोला जोडणाऱ्या अंतर्गत रिंग मेट्रो, छेडा नगर ते ठाण्यात आनंदनगर उन्नत पूर्व, मुक्त मार्ग, नवी मुंबई विमानतळ तसेच ठाणे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे.
हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सुमारे ३,३१० कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत महत्त्वाची कनेक्टिव्हीटी निर्माण होणार आहे. याशिवाय, सुमारे २,५५० कोटी रुपयांच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या टप्पा-१ ची पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पात प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
दुसरीकडे बांधकाम होण्याच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेची ३२ मजली उंच प्रशासकीय इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. रेमंडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत बांधण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मुंबईतील ही पहिलीच भूमिगत मेट्रो आहे. पहिल्या टप्प्यात १२.६९ किमीच्या मार्गिकेचे उद्घाटन होईल. यात १० रेल्वे स्टेशन असतील.
ठाण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे बीकेसी मेट्रो स्थानकात येऊन ‘मेट्रो-३’च्या सेवेला हिरवा कंदील दाखवतील. बीकेसी ते सांताक्रूझ हा प्रवासही ते मेट्रोतून करणार आहेत. या मेट्रोत ते ‘लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच मेट्रो सर्व्हिस मोबाईल ॲॅप ‘मेट्रो कनेक्ट-३’चे अनावरणही मोदी करणार आहेत.
ठाण्यात कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी
सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून त्यात २० उन्नत आणि २ भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. यामुळे ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.