५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर; पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन

‘गेल्या १० ते १२ वर्षांत देशातील सुमारे ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे’, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेच्या अहवालाच्या हवाल्याने मंगळवारी केला.
५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर; पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन
५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर; पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन(Photo-X)
Published on: 

पुणे : ‘गेल्या १० ते १२ वर्षांत देशातील सुमारे ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे’, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेच्या अहवालाच्या हवाल्याने मंगळवारी केला. यापूर्वी गरिबीविरोधातील लढा केवळ ‘घोषणांपुरताच’ मर्यादित होता, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देताना गेल्या १२ वर्षांत शहरी वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठे ‘परिवर्तन’ झाल्याचे अधोरेखित केले. गरीबांचे सक्षमीकरण आणि सुशासनाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचा दावाही मोदींनी केला. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३चे उद्घाटन आणि पुणे मेट्रो टप्पा-२च्या भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पूर्वी गरिबीविरोधातील लढा केवळ घोषणांपुरताच मर्यादित होता. मात्र, आज भारत प्रत्यक्ष कृतीतून गरिबीवर मात करत आहे, असे मोदी म्हणाले. देशाची आर्थिक प्रगती आणि गरिबी निर्मूलन या दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक आणि कल्याणकारी योजनांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारत असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ मदत पुरविण्याऐवजी नागरिकांना सक्षम बनविण्यावर सरकारचा भर असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये...

प्रतिकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने त्यांच्या पाठीशी उभे असून, संकट काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशात १२०० किलोमीटरपर्यंत मेट्रोचे जाळे

मोदी म्हणाले, देशात २०१४ मध्ये केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होते. आज हे जाळे सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये केवळ १० ते ११ किमी मेट्रो मार्ग सुरू होता. आज सुमारे २०० किमी मेट्रो मार्ग सेवेत असून, ६८० किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.

भविष्यात शहरांमध्ये मोठी गुंतवणूक...

देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी ऊपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच गेल्या १० ते १२ वर्षांत ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यात यश आले आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी-चिंचवड मोबिलिटी केंद्र - मुख्यमंत्री

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रकि बस, इनर रिंगरोड, आऊटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)