काँग्रेसमुळे दलितांची पीछेहाट! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

आमचे सरकार आल्यावर आम्ही सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पीय निधी वाढवला. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय गठीत केले आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. याकडे त्यांनी लक्ष वेधले. महायुतीचे नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपूरजवळील कन्हान येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
काँग्रेसमुळे दलितांची पीछेहाट! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
Published on

नागपूर : स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील दलित, एससी, एसटी व ओबीसींना मागास ठेवण्याचे कारस्थान रचण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपवण्याचाही कॉंग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर इतकी वर्षे त्यांना कॉंग्रेसने भारतरत्नही प्रदान केला नाही, अशी टीका त्यांनी केली.

आमचे सरकार आल्यावर आम्ही सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पीय निधी वाढवला. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय गठीत केले आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. याकडे त्यांनी लक्ष वेधले. महायुतीचे नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपूरजवळील कन्हान येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

काँग्रेसकडूनच संविधानाशी धोकेबाजी

विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे आम्ही संविधान बदलत असल्याची ओरड विरोधक करतात, असे सांगून मोदी म्हणाले की, संविधानाशी धोकेबाजी काँग्रेसनेच केली आहे. देशात संविधान लागू झाल्यावर ते संपूर्ण देशात लागू व्हायला हवे होते. मात्र, तुम्ही काश्मीरला वेगळे संविधान का दिले? असा सवाल त्यांनी केला. असे वेगळे संविधान देण्याचा अधिकार असलेले कलम ३७० हटवण्याचे जेव्हा आम्ही ठरवले तेव्हा आम्हाला काँग्रेसनेच विरोध केला. त्यावेळी आम्हाला सांगितले जात होते की ३७० हटवले तर काश्मीरमध्ये आग लागेल. गेल्या पाच वर्षात कुठे आग लागली ते दाखवा, असे आव्हान मोदींनी यावेळी दिले.

१९ एप्रिलला तुम्ही देणार असलेले मत हे एक खासदार निवडण्यासाठी नाही तर विकसित भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या मजबूत पायाभरणीची सुरुवात करण्यासाठी द्यायचे मत आहे, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले. विरोधक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत भाजप संविधान बदलणार अशी ओरड करते. ही यांची वैचारिक दिवाळखोरीच नाही का? त्यांना आमच्याविरुद्ध टीका करायला दुसरी कोणतीही नवीन कल्पना सुचत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली.

विरोधकांची इंडिया आघाडी ही देशाला खंडित करण्याच्या मागे लागली आहे. त्यासाठी त्यांनी इतकी वर्षे जनतेत भांडणे लावली. जाती-जातीत कलह निर्माण केला, असा आरोप मोदींनी यावेळी केला.

आज देशातील विरोधक सनातन संस्कृती संपवण्याच्या मागे लागले आहेत. राम मंदिर त्यांनी गेली अनेक वर्षे होऊ दिले नाही. ज्यावेळी राम मंदिर पूर्ण होऊन तिथे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची वेळ आली त्यावेळी त्या समारंभावर विरोधकांनी बहिष्कार टाकला, अशी टीका त्यांनी केली. सनातन धर्म संपवू बघणाऱ्या या पापी लोकांना शिक्षा द्यायला हवी की नाही, असा सवाल करत त्यांना पराभूत करणे हीच शिक्षा असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी मराठीत सुरुवात करत प्रभू रामचंद्र, नागपूर राजधानी स्थापन करणारे पहिले राजे रघुजी भोसले, बाबा झुमदेव, गोंड राजे बख्त बुलंद शाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना नमन केले. आपल्या भाषणात मोदींनी महायुती सरकारने विदर्भात काय-काय विकास कामे केली त्याचाही आढावा घेतला. सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांची भाषणे झाली.

नाना पटोलेंचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरीब लोकांची आठवण येते. १० वर्षात या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. १० वर्षात या समाज घटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या, गरिबांना अधिक गरिब बनवले आणि आता लोकसभेच्या निवडणुका आल्यावर एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण झाली का? असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in