पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

मुंबई : महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही मुंबईवर विजय मिळविणे अत्यावश्यक आहे. दोन्ही बाजूंनी सध्या मुंबईत प्रचाराची राळ उडवून देण्यात आली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या प्रचारयुद्धात उतरत आहेत. बुधवारी १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो आयोजित करण्यात आला आहे. महायुतीकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची आधी दिंडोरी व नंतर कल्याण येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर मोदी हे रोड शोसाठी मुंबईत येणार आहेत. मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात भाजपचे मिहिर कोटेचा उभे आहेत. त्यांच्या मतदारसंघात मोदींचा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावरील श्रेयस सिनेमापासून त्यांचा रोड शो सुरू होईल. पंतप्रधान मोदींच्या या रोड शोसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदलही करण्यात आले आहेत.

मुंबईतील सहा मतदारसंघ हे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत अनेक बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचे तांत्रिक बाबींवर निर्णय झाले आहेत. मात्र, मुंबईत अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची भावना आहे. तसेच शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असेच चित्र आहे. भाजप आणि महायुतीला नेमके हेच वातावरण बदलायचे आहे. त्यासाठी महायुतीने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील प्रचारात उतरविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या वेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. घाटकोपर ते मुलुंड पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार राहतात. तसेच उत्तरभारतीय मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. पंतप्रधान मोदींच्या या रोड शोमुळे या मतदारसंघातील मतांची गणिते बदलू शकतात, अशी भाजपला आशा आहे.

घाटकोपर येथून रोड शोला सुरूवात

पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला संध्याकाळी पाच वाजता घाटकोपर पश्चिम येथून सुरुवात होईल. रोड-शोची सुरुवात अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम इथून होऊन पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व येथे रोड-शो समाप्त होईल. या रोड शोमध्ये महायुतीचे नेते, लोकसभा उमेदवार सहभागी होणार आहेत.

सोनिया-राहुल गांधींनीही केले होते रोड शो

याआधी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबईत रोड शो केला होता. या रोड शोला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर २००९ मध्येही असा रोड शो झाला होता. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुंबईत रोड शो केला होता.

वाराणसीतून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

गंगा नदीच्या तीरावरील दशश्वमेधघाट आणि काळभैरव मंदिरात प्रार्थना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. वेदमंत्रांच्या जयघोषात मोदी यांनी घाटावर आरतीही केली. या वेळी एनडीएचे अनेक नेते, केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री हजर होते. त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पांढऱ्या शुभ्र रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर निळ्या रंगाचे जाकीट असा पेहराव केलेल्या मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोदींकडे ३ कोटींपेक्षा अधिक संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली एकूण मालमत्ता ३.०२ कोटी रुपये असल्याचे आणि त्यांच्या मालकीचे घर आणि गाडी नसल्याचे मंगळवारी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात म्हटले आहे. त्याचप्रमाणे मोदींकडे ५२ हजार ९२० रुपयांची रोकड आणि २.८५ कोटी रुपयांच्या बँकेतील ठेवी आहेत. सोन्यातील गुंतवणूक २.६७ लाख रुपये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणूक ९.१२ लाख इतकी आहे. सरकारकडून मिळणारे वेतन आणि बँकेकडून मिळणारे व्याज हे आपले उत्पन्नाचे साधन आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आपल्याकडे गुजरात विद्यापीठाची एम.ए.ची पदवी तर दिल्ली विद्यापीठाचे १९७८ च्या तुकडीचे आपण पदवीधर असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in