पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर; १५ हजार घरांचे होणार लोकार्पण

गेल्या आठवडाभरातील मोदी यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. याआधी मोदी हे १२ जानेवारीला नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले
पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर; १५ हजार घरांचे होणार लोकार्पण
@ANI

मुंबई : असंघटित कामगारांसाठी बांधलेल्या घरांचे लोकार्पण आणि राज्यातील पाणीपुरवठा तसेच मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. गेल्या आठवडाभरातील मोदी यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. याआधी मोदी हे १२ जानेवारीला नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते.

मोदी यांचे शुक्रवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सोलापुरात आगमन होईल. या दौऱ्यात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव आणि भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

१ हजार २०१ कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:सारण सुविधा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत सोलापुरातील १० हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात येईल.

कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार यांच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील ३० हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते ९ जानेवारी २०१९ रोजी झाले होते. मोदी यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालक मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in