अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ

PMC Election : निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘डिझाईन बॉक्स’च्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली.
अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ
Published on

पुणे : यंदाच्या पुणे मनपा निवडणुकीत महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका केली होती. आता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘डिझाईन बॉक्स’च्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. मात्र, अचानक ही कारवाई का करण्यात आली, याचे कारण समजू शकले नाही.

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यातच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. अरोरा यांची ‘डिझाईन बॉक्स’ कंपनी ही लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे काम करते. अजित पवारांच्या प्रचारसभांपासून सर्व रणनीती आखण्याचे कामही करते. या कंपनीमार्फत अजित पवारांची प्रतिमा जनमानसात बदलण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. या ‘डिझाईन बॉक्स’च्या कार्यालयात पुणे गुन्हे अन्वेषण पथकाने काही कागदपत्रांची पडताळणी केली.

अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ते करताना पवारांनी मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे यांसारख्या नेत्यांवर वैयक्तिक टीकाही केली. अजित पवारांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला कोंडीत पकडण्याचे काम केले. मात्र, पक्षाच्या त्यामागच्या धोरणात्मक रणनीतीत महत्त्वाची भूमिका ‘डिझाईन बॉक्स’ची होती. त्यामुळे ही कारवाई निवडणूक प्रचाराशी जोडली जाण्याची शक्यता आहे.

या कारवाईमागे कुणाचे कारस्थान आहे का, यामागचा मास्टरमाइंड कोण, हे आम्ही १६ तारखेनंतर सांगू. पोलिसांनी त्यांची कारवाई केली त्याबाबत हरकत नाही. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी असे कुभांड केलेय का, त्याचे उत्तर १७ तारखेला देऊ. ही कारवाई वरून साधीसोपी वाटत असली तरी त्यामागे राजकीय किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in