

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा' प्रक्रियेत 'विशेष' परीक्षा केंद्र मिळवून देण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने तातडीने दखल घेत पोलीस आणि सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला एका पालकाला कथितरीत्या काही अटी-शर्तीवर 'विशेष' परीक्षा केंद्र मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहे. या केंद्रावर परीक्षा दिल्यास विद्यार्थ्याला पसेंटाइल नामांकित अतिशय उच्च मिळतील आणि शासकीय किंवा अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चित होईल, असा दावा या महिलेकडून करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि विरोधी पक्षांनी एमएच-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत. बारावीच्या परीक्षेत साधारण गुण मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये थेट ९९ ते १०० पर्सेटाइल मिळाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे राज्य सीईटी कक्षाचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप अद्याप अनधिकृत असली, तरी आम्ही तिची त्वरित दखल घेतली आहे. सीईटी कक्षाकडे याविरोधात कोणतीही थेट लेखी तक्रार आलेली नसली, तरीही आम्ही खबरदारी म्हणून राज्य सायबर सेल आणि मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे, असे सरदेसाई म्हणाले.
काँग्रेसचे आरोप
मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी एका भाजप नगरसेवकांचाया पाल्यांचे उदाहरण देत गंभीर आरोप केले आहेत. गाडे यांनी दावा केला की, नांदेडमधील एका भाजप नगरसेवकाच्या मुलाला आणि मुलीला बारावीच्या पीसीएम गटात अनुक्रमे ५६टक्के आणि ५१टक्के गुण मिळाले होते. तसेच जेईई परीक्षेत त्यांना ५१टक्के आणि २८टक्के गुण मिळाले, परंतु एमएच-सीईटी परीक्षेत दोघांनीही थेट ९९ पर्सेटाइल मिळवले. हे गुण कसे मिळाले, त्यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच मिळाली होती का, असा सवाल गाडे यांनी उपस्थित केला आहे.
यावर स्पष्टीकरण देताना सरदेसाई म्हणाले, सुमारे ४.६३ लाख विद्यार्थ्यांनी एमएच-सीईटी परीक्षा दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील मोजक्या अपवादात्मक प्रकरणांवरून संपूर्ण परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका घेणे अयोग्य आहे. काही विद्यार्थी बारावीपेक्षा प्रवेश परीक्षांची तयारी अधिक गांभीर्याने करतात. मात्र या वादामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.