विकास लवांडेप्रकरणी पोलिसांची नामुष्की; भलताच गुन्हा नावावर दाखवला; चूक केली मान्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला शुक्रवारी न्यायालयात विरोध करताना पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
विकास लवांडेप्रकरणी पोलिसांची नामुष्की; भलताच गुन्हा नावावर दाखवला; चूक केली मान्य
विकास लवांडेप्रकरणी पोलिसांची नामुष्की; भलताच गुन्हा नावावर दाखवला; चूक केली मान्य
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला शुक्रवारी न्यायालयात विरोध करताना पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. ज्या गुन्ह्याशी लवांडे यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्याचे पोलिसांनी अखेर मान्य केले आहे. न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये ही सर्व प्रक्रिया केवळ नजरचुकीने घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकारानंतर पोलिसांची ही खरोखरच नजरचूक होती की एका राजकीय प्रवक्त्याला चुकीच्या माहितीच्या आधारे अडकवण्याचा हा प्रयत्न होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. विकास लवांडे यांना पोलिसांनी केलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचे सुळे म्हणाल्या.

विकास लवांडे यांच्यावर ८ मे रोजी वाघोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान पोलिसांनी लवांडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा केला होता. २०१७ मध्ये बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, तपासात असे समोर आले की, २०१७ मध्ये लवांडे यांच्यावर नथुराम गोडसेच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, जो शासनाने २०२२ मध्येच मागे घेतला आहे.

विकास लवांडेप्रकरणी पोलिसांची नामुष्की; भलताच गुन्हा नावावर दाखवला; चूक केली मान्य
Pune : वारकऱ्यांसंदर्भातील विधान; विकास लवांडे यांना अटक

पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर चक्क दुसराच गुन्हा दाखवला, जो गौतम कांबळे नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीवर दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी दाखल होता. धक्कादायक म्हणजे, त्या गुन्ह्यातून संबंधित आरोपीची निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे. लवांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी सुरू असल्याचा आरोप केला होता.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. मात्र खऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी लवांडे यांनाच चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. पोलिसांनी न्यायालयात ही अटक नजरचुकीने झाल्याचे कबूल केले असून यावरून पोलीस यंत्रणेवर कोणातरी अदृश्य शक्तीचा दबाव असल्याचा संशय सुळे यांनी व्यक्त केला. ज्याच्यावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला करणारे मोकाट फिरत आहेत, असा अन्याय आपण कधीही पाहिला नसल्याचे सांगत या दडपशाहीच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in