मुंबई : राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी गृह विभागाने तातडीने पोलीस हवालदार भरतीची घोषणा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून १७ हजार ४७१ पोलीस हवालदारांची लवकरच भरती होणार असून या उमेदवारांची बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. या जागासाठी आतापर्यंत १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांचे अर्ज आल्याचे सांगण्यात आले. त्यात डॉक्टर, बीटेक, एमबीए पदवी घेतलेल्या काही उमेदवारांचा समावेश आहे.
कॉपी, डमी आणि चिप अदलाबदलीसारख्या घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गैरकृत्य करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. गेल्या काही वर्षांत राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणात पोलीस हवालदार पदे रिक्त आहेत. त्यामुळे टप्याटप्याने ती पदे भरण्यात येतील आणि भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे गृहविभागाने जाहीर केले होते. त्यामुळे गृहविभागाने आता १७ हजार ४७१ जागांसाठी पोलीस भरती सुरू केली आहे. त्यात ९ हजार ५९५ पोलीस हवालदार, १ हजार ६८६ पोलीस हवालदार चालक, ४ हजार ३४९ एसआरपीएफ आणि १ हजार ८०० जेल अंमलदारांचा समावेश आहे. या पदासाठी आतापर्यंत १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. काही उमेदवारांनी दोन पदांसाठी अर्ज केले होते. दोन्ही पदासाठी एकाच वेळेस मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रतयेक जिल्ह्यांत मैदानी आणि लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हाटकर यांनी सांगितले.
गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई
एक उमेदवार दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र तो दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे. ज्या ठिकाणी पावसामुळे चाचणी होणार नाही, तिथे परीक्षा पुढे ठेवली जाणार आहे. पावसाचा अंदाज घेतल्यानंतरच ही मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी वेल्फअर हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेत कुठलाही अनुचित प्रकार खपवून घेणार नाही, असे सक्त आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा दोषी उमेदवारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पोलीस भरतीदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडला होता. मात्र यंदा असा प्रकार होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.