

जळगाव : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ पातळीवर तिकीट मिळवण्यासाठी गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रताप पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विधान परिषदेच्या या जागेवर दोन वेळा भाजपा तर दोन वेळा शिवसेना विजयी झालेली आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. तरीही विजयी होण्यासाठी मतांचे गणित पाहता बहुमताचा आकडा हा भाजपाकडे आहे. त्यामुळे भाजपा जळगावच्या जागेसाठी ठाम आहे. या निवडणुकीसाठी ६३० मतदार असून गेल्या २० वर्षापासून ही जागा भाजपाकडे असल्याने ती जागा प्रतिष्ठेची बनली आहे. या जागेसाठी इच्छुकांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. मात्र उमेदवार देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
२०१० मध्ये शिवसेनेकडून मनीष जैन आणि भाजपाकडून एकनाथ खडसे यांचे पुत्र निखील खडसे यात झालेली लढत ही राज्यभर गाजली होती. यात निखील खडसे यांचा १७ मतांनी पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपाकडून गुरूमुख जगवानी हे बिनविरोध निवडून आले होते तर २०१६ मध्ये भाजाचे चंदुलाल पटेल हे विजयी झाले होते. यामुळे भाजपाने या जागेवर दावा केला असून जागा वाटपात भाजपा व शिंदे गट यात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहिती नुसार, भाजपा विधान परिषदेच्या १२ जागा लढवणार असून त्यात जळगावची जागा आहे.मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलासाठी जळगावच्या जागेचा आग्रह धरल्यास कदाचित मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.