राजकीय उदासीनतेचा केळी निर्यातीला फटका; उत्पादन क्षेत्र अधिक असूनही जळगाव पिछाडीवर, कमी क्षेत्रफळाचे सोलापूर केळी निर्यातीचे हब
जळगावच्या केळीची गुणवत्ता ही उत्तम असली तरी शासनाकडून केळी निर्यातीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जळगाव केळी निर्यातीचे हब होऊ शकले नाही. मात्र लागवडीचे क्षेत्र कमी असून देखील केळी निर्यातीत सोलापूर हे केळी निर्यातीचे हब बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जळगाव केळी निर्यात हब न होण्यामागे केवळ राजकीय उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यात आज ६२ हजार हेक्टरमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे बारामाही उत्पादन घेतले जाते. जळगावचे हवामान, पाणी आणि माती हे केळीसाठी विशेष पोषक असल्याने येथील केळी ही गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम असतात. जळगावमधील केळीला परदेशातून चांगली पसंती देखील मिळत असल्यामुळे त्याची निर्यात अधिकाधिक होणे गरजेचे असल्याचे व्यावसायिकांनी म्हटले आहे. आज सोलापूर जिल्ह्यात टेंभूर्णी येथे ३० हजार मे. टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज आहे तर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होत असतांना देखील जिल्ह्यात एकही कोल्ड स्टोअरेज नाही. याचा मोठा फटका केळी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे केळी तज्ज्ञांचे मत आहे. तसेच या चारही रेल्वे स्थानकावर कंटेनर टार्मिनलची सुविधा व्हावी, ही जुनी मागणी असली तरी त्याकडे आजवरच्या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वांनी लक्षच दिले नाही, त्याचा फटका देखील निर्यातीस बसला आहे. त्यामुळे अपेडाने ही कोल्ड स्टोअरेजची निर्मिती करावी, अशी अपेक्षा केळी उत्पादक व्यक्त करतात. जळगावला केळी क्लस्टरची घोषणा झाली असली तरी अपेडाकडून पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अपेडाने आपला येथील सहभाग वाढवणे गरजेचे असून केळीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.
केळीची गुणवत्ता आणि उत्पादनात यात भारत देश अग्रस्थानी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये भारत १८ व्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा लहान देश केळी निर्यातीत आज पुढे आहेत, यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्ड स्टोअरेज, शेतातून पॅक हाऊसपर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
जळगावपेक्षा सोलापूरची निर्यात अधिक
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ५२०० कंटेनर म्हणजेच १०,४००० टन केळी निर्यात करण्यात आली आहे. तर २०२५ मध्ये ७५०० कंटेनर केळीची म्हणजेच दीड लाख टन केळी जळगाव जिल्ह्यातून निर्यात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचवेळी केवळ १४००० हेक्टर केळी लागवड क्षेत्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून १६००० कंटेनर म्हणजेच ३६ हजार मे. टन केळीची परदेशात निर्यात झाली. यंदा ही निर्यात २५ हजार कंटेनर म्हणजेच पाच लाख मे. टन होईल, असा अंदाज आहे.
कोल्ड स्टोअरेज सुविधेअभावी जळगावचे नुकसान
जैन इरिगेशनने केळीवर संशोधन करून १९९४ ला टिश्यूकल्चर तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. जोडीला ठिबक सिंचन, फर्टिगेशन, प्रिसीजन फार्मिंग, क्रॉप केअर अग्रेसर काम केले आहे. यामुळे निर्यातक्षम केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले असले तरी जिल्ह्याची केळी निर्यात वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर कोल्ड स्टोअर, स्कॅनर्स उपलब्ध करून द्यावे, रेल्वे स्थानकावर कंटेनर लोडिंग व प्लगिंगची व्यवस्था करावी, गुणवत्तेसाठी पॅकिंगमध्ये तंत्रज्ञान उपलब्ध करण्याची गरज आहे आणि हे सर्व करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय उदासीनता दूर होण्याची गरज आहे, तसे झाले तरच जळगाव केळी निर्यातीत हब बनू शकेल, अशी जळगावकरांनी भावना व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज रावेर, निंभोरा, सावदा, कजगाव या रेल्वे स्थानकांवर गेल्या ७० वर्षांपासून केळी वॅगन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथे जर प्रत्येक स्थानकावर किमान दहा हजार मे. टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज उभारले गेले तर त्याचा फोर मोठा लाभ निर्यातीसाठी होऊ शकतो.
- के. बी. पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ