
मुंबई : नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा आजही कायम असून महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू तू मैं मैं सुरुच आहे. नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असली तरी अजित पवार पक्षाच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद दिल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी आजही कायम आहे.
रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तेव्हा गोगावले यांना आवर घाला, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आला आहे.
भरत गोगवालेंनी आपली उंची पाहून बोलले पाहिजे. आम्हाला काढायचे म्हणले, तर गुवाहाटीलमधील हॉटेलच्या बाहेरचे आणि हॉटेलमधील व्हिडिओ आम्ही काढू शकतो. एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंना आवर घालावा. सर्व सुरळीत सुरू असताना दोस्तीत कुस्ती करू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालून योग्य तो न्याय करावा. महायुतीच्या निर्णयांचे स्वागत करण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. रायगडचा पालकमंत्री आमचाच असेल. सह पालकमंत्री भरत गोगावले असतील,” असे चव्हाण यांनी म्हटले.
तटकरे यांनी पाठित खंजीर खुपसला - गोगावले
आम्ही व्यवहाराने चालणारे आहोत. आमचं काम प्रामाणिक आहे. आम्ही चुकीचे काही करत नाही. सुनील तटकरेंनी विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे आमचे काम केले असते, तर आम्ही पालक मंत्रिपदाबाबत विचार केला असता. पण, तटकरेंनी आमचे काम केलं नाही. तटकरेंनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला. जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत. ते तुमचे-आमचे काय होणार?” असा प्रश्न गोगावलेंनी उपस्थित केला आहे.