मुंबई/अमरावती : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर करत राज्यातील बहिणींना जणू रक्षाबंधनाआधीच ओवाळणी दिली होती. या योजनेवरून टीकाटिपण्णी होत असतानाच, आता महायुतीतील नेत्यांनी लाडक्या बहिणींना मतांसाठी दमदाटी सुरू केल्याने ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठीच असल्याची चर्चा रंगली आहे.
लाडकी बहीण योजना हवी असेल तर आमचे बटण दाबा, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना साद घातली आहे. जर तुम्ही महायुतीला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ, अशी धमकी अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिली आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, “सत्ताधारी पक्षाची भाषा ही राज्यातील बहिणींचा अवमान करणारी आहे. त्यामुळे महायुती सरकारने बहिणींची माफी मागावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेत आहेत. यांना दोन वर्षांपूर्वी बहीण आठवली नाही. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, त्यावर सरकार बोलत नाही. आता मतासाठी फसव्या योजना आणल्या जात आहेत. राज्य चोरांचे झाले आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. कमिशनखोरी ४० टक्क्यांवर गेली आहे. बेरोजगारी वाढली असून उद्योग गुजरातला पळवण्यात आले आहेत. एक नंबरचे राज्य ११व्या स्थानी नेऊन ठेवले. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये टक्केवारीवरून शीतयुद्ध सुरू आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
वक्तव्य गमतीने केले - राणांची सारवासारव
लाडकी बहीण योजनेबाबत केलेले वक्तव्य हे गंभीरतेने केले नव्हते. ते गमतीमध्ये आणि हसतहसत केले होते. माझे वक्तव्य भावा-बहिणीतील नात्यामध्ये केले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही, यावरून कुणीही राजकारण करू नये. भाऊ हा बहिणीचे काहीही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करत असतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही, अशी सारवासारव नंतर रवी राणा यांनी केली.
अमरावतीत रवी राणा म्हणाले की, विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करू. मात्र ज्यांनी आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ म्हणून दीड हजार रुपये खात्यातून काढून घेईन.
आमदार रवी राणा
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान मेळाव्यात अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेचे कार्ड बाहेर काढले. “लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल, तर आमच्या नावांची बटणे दाबा. योजनांसाठी आम्हाला मतदान करा,” अशी साद त्यांनी महिलांना घातली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
"आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातले बोलले आहेत. आमच्या बहिणी दीड हजार रुपयांना मत विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, महायुतीचा आहे का?” असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
राज्यातील महायुती सरकार हे संपूर्णपणे नापास झाले असून खोटे चित्र दाखवून सरकारने मते घेतली. अजित पवार यांनी सांगितले की, तुम्ही बटण दाबले नाही तर योजना बंद होईल. त्यांच्या पोटातील ओठांवर आले आहे. हे लोक लाडकी बहीण योजनेतून ‘खुर्ची लाडकी’ योजना राबवत आहेत.
काँग्रेस आमदार नाना पटोले