मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने विजय मिळाला आहे. भाजपचा हा विजय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा विजय असून अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची हार आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
महाराष्ट्र, हरयाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलितांनी भाजपप्रणीत एनडीएला बहुमताचा कौल दिल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने होत आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाची बांधली जात आहेत.
त्यामुळे विकासाची दुरदृष्टी असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अतुट विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय बांडगुळाला दिल्लीकरांनी फटकारले - आशीष शेलार
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिल्लीकरांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी विश्वास दाखवला. सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा मफलरने गळा घोटणाऱ्या, फसवणाऱ्या आणि लुटेरे... संधीसाधू राजनीतीची साफसफाई करून दिल्लीकरांनी ‘झाडू’ला सत्तेबाहेर फेकले आहे. अचानक उगवलेल्या राजकीय बांडगुळाला दिल्लीकरांनी फटकारले, असा टोला भाजप मुंबई अध्यक्ष सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी केजरीवाल यांना लगावला. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरही २५ वर्षं भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार, असा टोला उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर ‘मोठा भोपळा’ देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली आहे. ईव्हीएमला दोष देत आपले अपयश झाकण्याचा कार्यक्रम आता अजून जोरात करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक या सगळ्यांचे शेलार यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र जिंकला, राजधानी दिल्ली पण जिंकली, आता आर्थिक राजधानीतही मुंबईकर असाच बदल घडवणार. २५ वर्षं पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.