एकत्र निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सरसावले, कोविंद समितीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थन, राजकीय पक्षांकडून ३५ निवेदने

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने ‘एक देश, एक निवडणुकी’बाबत जनतेकडून तसेच विविध राजकीय पक्षांकडून अभिप्राय मागवला आहे.
एकत्र निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सरसावले, कोविंद समितीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थन, राजकीय पक्षांकडून ३५ निवेदने
ANI

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने ‘एक देश, एक निवडणुकी’बाबत जनतेकडून तसेच विविध राजकीय पक्षांकडून अभिप्राय मागवला आहे. लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीला विविध राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे.

‘एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच; तसेच कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुका अलीकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरयाणासहित अन्य काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर एकत्रित निवडणुका झाल्या असत्या तर राजकीय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचता असता, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

“केंद्रातील ‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात ‘एक देश, एक निवडणुकी’चा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, तसेच ही बाब देशाच्या विकासात व्यत्यय आणते,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कोविंद समितीने अलीकडेच राजकीय पक्षांना पत्रे लिहून देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत त्यांचे मत मागवले होते. ६ राष्ट्रीय पक्ष, २२ राज्य पक्ष व इतर ७, अशा ३५ पक्षांना ही पत्रे पाठवण्यात आली होती. समितीने एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत विधी आयोगाचे मतही जाणून घेतले आहे.

logo
marathi.freepressjournal.in