मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणारी तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बुधवार २९ मेपासून सुरू होणार आहे. २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. या प्रवेशाच्या तीन फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी ३९० संस्थांमध्ये सुमारे १ लाख ५ हजार जागा उपलब्ध आहेत.
दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा आहेत. त्यांच्या इतर सर्व शाखा या मुख्य शाखेच्या अंतर्गत उपशाखा आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे शाखा निवडून अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया असणार आहे. पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेशप्रक्रियेचा तपशील, माहितीसाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची https://dte. maharashtra .gov.in या लिंकवर संपर्क साधावा.
यंदा केलेले बदल
-एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित असणार
-थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी असणार
-थेट द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाची शाखा बारावीच्या विषयानुसार निवडता येणार.
-केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा तीन फेऱ्या होणार
-छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार
-दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३१६ सुविधा केंद्र
-मार्गदर्शनसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी