
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना बुधवारी चांगलाच दणका दिला. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करून भविष्यात त्यांना ‘यूपीएससी’च्या कोणत्याही परीक्षेला बसण्यावरही बंदी घातली आहे.
‘यूपीएससी’ने उपलब्ध नोंदीची काळजीपूर्वक तपासणी केली आणि खेडकर यांनी ‘सीएसई-२०२२’ नियमातील तरतुदींविरुद्ध कृती केल्याचे आढळले, असे ‘यूपीएससी’ने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. त्या अनुषंगाने पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी (आयएएस) उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे त्यांना ‘यूपीएससी’कडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांना बसण्यावर आणि निवडीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यातआला आहे.
आम्ही गेल्या १५ वर्षातील नोंदी तपासल्या असता असे आढळले की, ‘सीएसई’ची परीक्षा देण्यासाठी खेडकर यांना जेवढी संधी देण्यात आली, तेवढी संधी अन्य कोणालाही देण्यात आली नाही, त्या एकमेव अशा उमेदवार आहेत, असे ‘यूपीएससी’ने म्हटले आहे. खेडकर यांनी आपले नावच बदललेले नाही, तर आपल्या पालकांचेही नाव बदलले. हे त्यांना नियमापेक्षा अधिक वेळा परीक्षेला बसण्याची संधी मिळाल्याचे मुख्य कारण आहे. भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेडकर यांनी बनावट ओळख देऊन मान्यतेपेक्षाही अधिक वेळा परीक्षेला बसण्याची अनुमती मिळविली. त्याबद्दल त्यांच्यावर १८ जुलै रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली होती.
अटकपूर्व जामिनावरील निर्णय अद्याप प्रलंबित
एकीकडे ‘यूपाएससी’ने पूजा खेडकर यांच्यावर उमेदवारी रद्द करण्याची कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाळा कोर्टाने कोणताही निर्णय दिलेला नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान ‘यूपीएससी’च्या नव्या अध्यक्षा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आरोग्य विभागाच्या माजी सचिव प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुदान यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. प्रीती सुदान या सध्या ‘यूपीएससी’च्या सदस्या असून त्या गुरुवारी आपल्या नव्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत अथवा २९ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान या १९८३ च्या तुकडीतील आंध्र प्रदेश श्रेणीच्या सनदी अधिकारी आहेत.