
नवी मुंबई : मिक्सर आणि लँड क्रुझर गाडीत झालेल्या किरकोळ अपघातप्रकरणी नुकसानभरपाई वसुली करण्यासाठी मिक्सर चालक आणि मदतनीस याचे अपहरण केल्याप्रकरणी वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्याही विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ तारखेला ट्रांजिट मिक्सर वाहन आणि कार यांचा किरकोळ अपघात मुलुंड ते ऐरोली हायवेवर जाणाऱ्या लेनवर मॅकडॉल सिग्नलजवळ झाला होता. यात कारमधील दोघांनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून कारचालकाने व त्याच्या साथीदाराने मिक्सर क्लिनर (हेल्पर) प्रल्हाद कुमार यांचे अपहरण केले होते. मिक्सर मालकाने दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासात ही कार पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका बंगल्यात
आढळून आली. या बंगल्यात पूजा खेडकर यांचे पालक राहत असल्याचे समोर आले. संशयित अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी रबाळे पोलीस गेले होते. मात्र पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच प्रल्हाद कुमार याला सोडून दिले.
शनिवारी संध्याकाळी ऐरोलीत मिक्सर ट्रकची लॅन्ड क्रुझरला किरकोळ धडक बसली. त्यानंतर संतप्त झालेल्या दिलीप खेडकर व त्यांच्या बॉडीगार्डने ट्रकवरील हेल्पर प्रल्हाद कुमार (वय २२) याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. पोलीस स्टेशनला घेऊन जातो असा बहाणा करून त्यांनी प्रल्हादला थेट पुण्यातील बावधन येथील आपल्या बंगल्यावर नेऊन डांबले. इतकेच नव्हे, तर त्याचा मोबाईलही फ्लाइट मोडवर ठेवण्यात आला होता.
आईवरही गुन्हा दाखल
पाषाण रस्त्यावरील एका बंगल्यात खेडकर राहत असलेल्या बंगल्यात पोलीस गेले असता मनोरमा खेडकर यांनी ओळख पत्र दाखवूनही पोलिसांना प्रवेश दिलाच नाही. शिवाय त्यांच्या अंगावर कुत्रे सोडले. आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात येऊ असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्या आल्या नाहीतच. शिवाय त्यांनी अपघातात असणारी गाडी जागेवरून हलवत अज्ञात स्थळी लपवली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.