मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते वडपाले दरम्यानच्या २६.७ किमी अंतरावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करून अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, प्रकल्प समन्वयक अभियंत्यास अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रदीर्घकाळ रखडले आहे. या महामार्गावर खड्डे पडले आहेत. काही भागांत चक्क पेव्हरब्लॉकचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे कोकणवासीयांसाठी अत्यंत जिकिरीचे झाले आहे. या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन मागील दोन वर्षांपासून सत्ताधाऱ्यांमार्फत दिले जात असले तरी प्रत्यक्षात त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाहणी दौरे करूनही रस्त्याच्या कामात सुधारणा झालेली नाही. या महामार्गाची जागोजागी खड्डे पडून चाळण झाल्याने शिमग्याच्याच नव्हे, तर गौरी-गणपती उत्सवाच्या काळात कोकणवासीयांचे प्रचंड हाल होत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तीन वेळा कारणे दाखवा नोटीस !
केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदाद्वारे चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे संयुक्त उपक्रमास दि. ०१/०६/२०१७ रोजी करार करून दि. १८/१२/२०१७ रोजी पासून कंत्राट सुरू करण्यात आले होते. महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेपैकी सर्वसाधारणपणे ९१.८०% इतकी जागा शासनातर्फे हस्तांतरित करण्यात आली होती. ठेकेदाराकडून सदर काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे होते. सदर कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ मिळूनही ठेकेदाराकडून सदर मुदतवाढ कालावधीत दरमहा १०% या वेगाने काम पूर्ण न होता फक्त ४.६% या वेगाने काम झाले. ठेकेदार यास महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. या दरम्यान कंत्राटदारांकडून करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा तपासून त्याने कामाचा योग्य दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे उघडकीस आले आहे.
अर्धवट काम
मुंबई-गोवा महामार्गाच्या एकाच लेनवरून जाणारी व येणारी वाहने अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये चालविणे वाहन चालकांना भाग पडत होते. ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही, त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवण्यात आला आहे. हे काम सुद्धा तसेच अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव व अंदाज येत नव्हता. त्यामुळे या महामार्गावर वारंवार मोटार अपघात होत होते. त्यात आजवर अनेक प्रवासी हकनाक मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, अनेक जण गंभीर तर कित्येक किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे.
१०७ अपघात, ९७ मृत्युमुखी
मे. चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर) यांनी इंदापूर ते वडपाले, जि. रायगड या भागातील महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकीकरणाचे काम सुरू केले; परंतु त्यांनी सदरचे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहीन काम केले. या ठिकाणी महामार्गास पडलेल्या खड्ड्यांमुळे, तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टिक पेंट (पांढऱ्या पट्ट्या), कॅट आईज, डेलीनेटर, वाहनचालकांच्या माहितीसाठीचे माहिती/सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी या उपाययोजना न केल्यामुळे नमूद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव व अंदाज न येता अपघात होऊन त्यामध्ये प्रवाशांची जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येऊ शकते याची पूर्णपणे जाणीव असताना देखील त्यांनी निष्काळजीपणा दाखवून वरीलप्रमाणे कामामध्ये पूर्तता न केल्याने सन २०२० पासून आजपावेतो वरीलप्रमाणे नमूद एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यात एकूण ९७ प्रवासी मृत्युमुखी पडले. २०८ प्रवाशांना लहान/मोठ्या गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. तसेच, अनेक वाहनांचे अतोनात नुकसान झाले. त्यास कारणीभूत असलेल्या मे. चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणाऱ्या नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बेलदार करीत आहेत.