विदर्भ-मराठवाड्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका; उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल, ३,६१५ तक्रारी

विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसला आहे.
विदर्भ-मराठवाड्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका; उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल, ३,६१५ तक्रारी
विदर्भ-मराठवाड्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका; उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल, ३,६१५ तक्रारीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सुजित ताजणे/ छत्रपती संभाजीनगर

विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पेरणी करूनही सोयाबीनची अपेक्षित उगवण न झाल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रकरणी राज्यभरातून कृषी विभागाकडे आतापर्यंत ३,६१५ तक्रारी दाखल झाल्या असून, बीजपरीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ५८१ नमुन्यांपैकी मोठ्या प्रमाणावर नमुने अप्रमाणित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने चार बियाणे कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले असून, या विषयावर उद्या विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत निकृष्ट बियाण्यांमुळे उगवण न झाल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत ४६८, तर बीड जिल्ह्यात ३१ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र अद्याप अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी दिली. तक्रारींमध्ये 'बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीविरोधात सर्वाधिक १,१२९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. एकूण १८ बियाणे कंपन्यांविरुद्ध कृषी विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, दोषी कंपन्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत.

राज्यात सुमारे १८.५७ लाख क्विंटल खासगी सोयाबीन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर निकृष्ट बियाण्यांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बीजप्रक्रियेतील त्रुटी, तसेच 'एल निनो'च्या प्रभावामुळे कमी व खंडित झालेला पाऊस, कमी ओलाव्यात झालेली पेरणी आणि खोलवर पेरणी ही उगवण न होण्याची प्रमुख कारणे असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

कारवाईचा इशारा

कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी तातडीने जिल्हा ग्राहक मंचाकडे नुकसानभरपाईचे दावे दाखल करावेत, असे आवाहन केले आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांनी मोफत व दर्जेदार बियाणे बदलून द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in