मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही! प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुढील अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार, अशी चर्चा सुरू असतानाच, आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.
मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही! प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती
Photo : X (Praful Patel)
Published on

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुढील अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार, अशी चर्चा सुरू असतानाच, आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. आमच्यापुढे सध्या विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी सोडून अन्य कोणताही व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होईल, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात मंगळवारी अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पटेल म्हणाले की, “आम्ही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांशी संवाद साधून सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो. पार्थ आणि जय पवार यांच्यासमोरच आम्ही त्यांना धीर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. अजितदादांच्या पश्चात तुम्ही पक्षाची जबाबदारी स्वीकारावी, ही जनतेची तसेच पक्षाच्या सर्व नेत्यांची भावना असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर सुनेत्रा पवारांनी आमच्या विनंतीला मान दिला.”

“तीन दिवसांचा दुखवटा पाळल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. आमच्या पक्षाच्याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू असताना, एका केंद्रीय मंत्र्याने चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. मी सध्या पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे विधिमंडळ किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रात ही जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“पक्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय योग्य पद्धतीनेच होईल. योग्य व्यक्तीचीच निवड केली जाईल. याहून अधिक मी सांगू शकत नाही. आमच्याकडून कोणतीही चर्चा नसताना, याप्रकरणी उगीच संशय निर्माण करणे ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. मला याविषयी अजिबात फार काही बोलायचे नाही,” असेही पटेल यांनी सांगितले.

राज ठाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? -पटेल

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पटेल म्हणाले की, “राज ठाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता कोण आणि अध्यक्ष कोण होईल, हे आम्ही ठरवू. राज ठाकरे किंवा सकाळी ९ वाजताच्या भोंग्याने आम्ही काय करावे हे सांगू नये. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.”

अपघातप्रकरणी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे ‘डीजीसीए’चे आदेश

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अजित पवार यांच्या विमान अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. अजित पवार प्रवास करत असलेल्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश ‘डीजीसीए’ने दिले आहेत. ‘लिअरजेट ४५ एक्सआर’ या विमानाच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी ‘डीजीसीए’ने विशेष पथक नियुक्त केले असून हा अहवाल १५ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक्स आणि विमानांच्या देखभालीच्या रेकॉर्ड्सची तपासणी पथकाकडून केली जाईल.

पटेलांनी घेतली मोदी-शहांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत बंद दरवाजाआड चर्चा केली. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा पेचप्रसंग तथा विलीनीकरणाच्या मुद्यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना पटेल यांनी मोदी व शहांची भेट घेतल्याने विविध चर्चांना पेव फुटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in