नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी....

वाराणसी : सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. याप्रसंगी प्रफुल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नरेंद्र मोदींना जिरेटोप घालून महायुतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) हा व्हिडीओ शेअर करत प्रफुल पटेल आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. त्यामुळं ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली..

प्रफुल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घालतानाचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं महायुतीवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत म्हटलं आहे की,

"जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!"

प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो-

महायुतीच्या नेत्यांच्या या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रफुल पटेलांचा समाचार घेतला. एक्स पोस्ट (पूर्वीचे ट्वीटर) करून ते म्हणतात की,

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे.... अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in