पहिल्याच दिवशी प्रगती एक्स्प्रेसचा विस्टाडोम कोच हाऊसफुल

पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरलेल्या विस्टाडोम डब्याचा समावेश असल्याने पहिल्याच दिवशी या डब्यातील आसने ९३ टक्के भरल्याची माहिती
पहिल्याच दिवशी प्रगती एक्स्प्रेसचा विस्टाडोम कोच हाऊसफुल
Published on

सोमवार २५ जुलैपासून प्रगती एक्सप्रेस पुन्हा पुणे- मुंबई- पुणे मार्गावर धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाकाळात बंद असलेल्या प्रगती एक्स्प्रेसची सेवा पुन्हा पूर्ववत करताना या गाडीला विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरलेल्या विस्टाडोम डब्याचा समावेश असल्याने पहिल्याच दिवशी या डब्यातील आसने ९३ टक्के भरल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. मडगाव एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या तीन गाड्यानंतर ही चौथी गाडी विस्टाडोम डब्यांसह धावत आहे.

मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पहिल्यांदा २०१८ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे २६ जून २०२१ पासून मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीनंतर १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई- पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही हा डबा जोडल्याचे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आता मुंबई- पुणे मार्गावर सुरू करण्यात येत असलेल्या प्रगती एक्स्प्रेसलाही विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे अशा अनेक सुविधांचा समावेश असलेल्या या डब्याला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत सोमवार २५ जुलै रोजी पहिल्याच दिवशी या गाडीच्या विस्टाडोम डब्यातील ४४ आसनांपैकी ४१ आसने प्रवाशांनी भरल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध करण्यात आले होते. दरम्यान, प्रगती एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेत सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पुण्यातून सुटणार आणि ११ वाजून २५ मिनिटांनी मुंबईला पोहचणार आहे. तर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ४ वाजून २५ मिनिटांनी रवाना होणार आहे तर ७ वाजून ५० मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in