राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार!

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. प्रज्ञा सातव यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, लवकरच त्या अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हा प्रवेश प्रत्यक्षात घडल्यास काँग्रेससाठी तो मोठा राजकीय धक्का ठरणार आहे.
राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार!
राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार!
Published on

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. प्रज्ञा सातव यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, लवकरच त्या अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हा प्रवेश प्रत्यक्षात घडल्यास काँग्रेससाठी तो मोठा राजकीय धक्का ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून, विश्वासू मोजक्या कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश प्रज्ञा सातव यांनी दिले आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोजक्या कार्यकर्त्यांसह त्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सातव या २०३० पर्यंत विधान परिषदेच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. मात्र, भाजप प्रवेशाआधी त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली होती. गेल्या वर्षी त्यांना काँग्रेसने पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवले होते. प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत.

राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. मोदी लाटेतही राजीव सातव हे दोनदा खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१९ नंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकीची जबाबदारी असताना राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपच्या नाकी नऊ आणले होते. भाजपला त्यावेळी काठावरचे बहुमत मिळाले होते. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा असा राजकारणातील प्रवास करत काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले होते.

ही चर्चा निराधार -सतेज पाटील

आमदार सतेज पाटील म्हणाले की, “प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली आहे. प्रज्ञाताई तसे पाऊल उचलतील, असे वाटत नाही. ही चर्चा निराधार आहे, असे मला वाटते. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. त्या असे कोणतेही पाऊल उचलतील असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.”

logo
marathi.freepressjournal.in