प्राजक्ता माळीची तक्रार; महिला आयोगाचे पोलिसांना कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
प्राजक्ता माळी,  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (डावीकडून)
प्राजक्ता माळी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (डावीकडून)
Published on

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित पोलिसांना दिले आहेत.

प्राजक्ता माळी हिच्या तक्रारीची दखल घेत हा तक्रारअर्ज मुंबई पोलीस कार्यालय, बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व अर्जाची एक प्रत सायबर क्राइम विभागाला पाठवण्यात आल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. सुरेश धस यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दरम्यान, प्राजक्ता माळी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांची तपासणी व्हावी आणि त्यावर कारवाई व्हावी, असे निर्देश पत्राद्वारे राज्य महिला आयोगाने सायबर क्राइम विभागाला दिले आहेत. तसेच संबंधित तक्रारअर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा तक्रार अर्ज राज्य महिला आयोगाला शनिवारी दुपारी प्राप्त झाला. गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये विविध यूट्यूब चॅनल, पेज आणि अश्लील भाषेतील कमेंट्स यांची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे प्राजक्ता माळी हिने तक्रार दाखल केली.

चारित्र्यहननामुळे कुटुंबाला मनस्ताप

या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, या कमेंट्समुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्य व करिअरवर परिणाम झाला आहे. चारित्र्यहनन करणाऱ्या वक्तव्यांमुळे प्रचंड मनस्ताप कुटुंबाला झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सनी केलेल्या बातम्यांमुळे मला अतिशय वेदना झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाने या सगळ्याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाला केली आहे.

धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

बीडच्या मस्साजोग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत काही वेळ चर्चा झाली असून, या चर्चेचा तपशील उपलब्ध झाला नाही, पण दोन्ही नेत्यांत संतोष देशमुख हत्याकांड व त्यासंबंधी होणाऱ्या कारवाईवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

सुरेश धस यांची अखेर दिलगिरी

बीड : प्राजक्ता माळी यांचे मन दुखावले असल्यास मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी सांगितले. आमदार सुरेश धस यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, प्राजक्ता माळी यांचे मन किंवा इतर कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करण्यात काही वाईट नाही, लहान होण्यात मला माझ्या आयुष्यात कधी कमीपणा वाटलेला नाही. हा विषय संपवून टाका.

logo
marathi.freepressjournal.in