

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला इटली दौरा हा केवळ अधिकृत परराष्ट्र दौरा नसून, तो इस्रायलला केल्या जाणाऱ्या छुप्या लष्करी पुरवठ्याची माहिती दडवण्यासाठी आणि एका वादग्रस्त रासायनिक कारखान्याची कागदपत्रे मिटवण्यासाठी होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.
भारताच्या या बदललेल्या परराष्ट्र धोरणामुळेच आज देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
आंबेडकर यांनी दावा केला की, भारत 'लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज’ सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून इस्रायलला ‘मिलिटरी ग्रेडेड स्टील’ पुरवत आहे. या स्टीलचा वापर युद्धात शेल्स बनवण्यासाठी केला जातो.
इटलीत ‘मूव्हमेंट’ आणि ‘नो हार्बर फॉर जेनोसाईड’ यांसारख्या कामगार संघटनांनी या लष्करी साहित्याने भरलेली चार जहाजे अडवून धरली आहेत. या जहाजांमध्ये ८०० टन लष्करी दर्जाचे स्टील असून ते इस्रायलला पाठवले जात होते. ही बाब आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये उघड झाल्यामुळे आणि भारताची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांची भेट घेऊन ही जहाजे सोडवण्यासाठी आणि प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी रदबदली केली, असे आंबेडकर म्हणाले.
इटलीतील 'मेथी' कंपनी घातक 'फॉरेव्हर केमिकल्स' तयार करते, ती भारतातील एका कंपनीने विकत घेतली असून तिची यंत्रसामग्री रत्नागिरी, औरंगाबाद आणि जालना भागात आणली जात आहे. हे केमिकल आरोग्यासाठी घातक असल्याने इटलीने त्यावर बंदी घातली असून त्या कंपनीचे मालक तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कायदेशीर कागदपत्रे भारतीयाच्या हाती लागू नयेत, याची खबरदारी घेण्यासाठी पंतप्रधान इटलीला गेले.
गंभीर परिस्थिती निर्माण होणार
भारताच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून इराण, रशिया आणि चीन या देशांनी भारताला होणारा तेल आणि गॅसचा पुरवठा कमी केला आहे. इराणला जेव्हा समजले की भारत इस्रायलला लष्करी मदत करत आहे, तेव्हा त्यांनी कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित केला, ज्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर आणि उपलब्धतेवर झाला आहे. या चुकीच्या धोरणांमुळे आगामी मार्चपर्यंत देशात इंधनाची आणि खतांची तीव्र टंचाई निर्माण होऊन एक प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.