
अकोले येथील दंगल हेतुपुरस्सर घडविण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी नागपूर एसआयटीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात केव्हा आणि कधी काय घडू शकते, हे नमूद केले आहे. त्या अहवालात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अहवालात ज्यांचे नाव असेल, जे दंगलीत सापडले असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप बरेच राजकारण घडायचे आहे. सध्या दोन बॉम्ब फुटलेत. अजून दोन बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट अॅण्ड वॉच’. पण जे काही बाहेर पडेल, ते खरे बाहेर पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असे भाकीतही आंबेडकर यांनी व्यक्त केले.
अकोले येथील दंगलीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘अकोले येथील दंगल पुरस्कृत आहे. सहा महिन्यांपूर्वी नागपूर एसआयटीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात केव्हा आणि कधी काय घडू शकते, हे नमूद केले आहे. त्या अहवालात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्यानुसार अहवालात ज्यांचे नाव असेल, जे दंगलीत सापडले असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
‘‘राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरु असून दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात नाही तोपर्यत या दंगली थांबणार नाहीत,’’ असे आंबेडकर म्हणाले. ‘‘कर्नाटकमध्ये धार्मिक मुददयावर मतदान झाले नसून तेथील लोकांनी त्यांना जे योग्य वाटले त्यांना मतदान केले. त्यामुळे दंगलीतून मतदान बदलेल असा जो पूर्वीचा काळ होता तो आता संपलेला आहे. लोकं आता वास्तव्यावर मतदान करतात अशी परिस्थिती आहे. दलितांनी भाजपाविरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी कमी झाली. आता हीच परिस्थिती देशभर होणार आहे,’’ असेही आंबेडकर म्हणाले.