
एकीकडे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेकर यांच्या युतीची चर्चा असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर चांगलीच चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या त्यांच्या चर्चेवर अनेकांनी तर्कवितर्क लावले. अशामध्ये आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "शिंदे गटाने भाजपची साथ सोडल्यास युती करायला आम्ही तयार आहोत. पण, सध्या आम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहोत." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, "मी काल दिल्लीमध्ये असताना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातून फोन आला होता. त्यानंतर मी संध्याकाळी त्यांची भेट घेतली. आमच्यामध्ये विविध विषयांवर अडीच तास चर्चा केली." युतीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर म्हणाले की, "महाराष्ट्रात पुढील निवडणुका आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच लढणार आहोत. या भूमिकेमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. भाजपसोबत, आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षांसोबत आम्ही कधीही जाऊ शकत नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत. आमच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे. मात्र, त्याचा जाहीर खुलासा केलेला नाही. यासंदर्भात, पत्रकार परिषद घेऊन जाहीर खुलासा करावा अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली आहे. पण, त्यापूर्वी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी चर्चा करू द्या, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मी चांगलाच ओळखतो. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास या दोन पक्षांकडूनच नकार आहे. उद्धव ठाकरेंना मी बोललो आहे की, हे दोनही पक्ष तुम्हाला फसवतील."