राज्यात मराठा आंदोलनाचा विषय ऐरणीवर आला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. याच पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. अनेक नेत्यांना मराठा समजाबांधवांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं आहे. याच आंदोलनाने हिंसक वळण घेत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर जाळण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेत माहिती दिली की, माझ्या घरावर हल्ले करणारे हे समाजकंटक होते. त्यात स्थानिक माफिया मिसळले होते. घर जाळल्याच्या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांनीचं माझा जीव वाचवला, असं वक्तव्य सोळंके यांनी केलं आहे. ते म्हणाले की, ज्यांनी माझं घर जाळलं त्यांच्यावर कारवाई केली जावी. सर्व सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांना दिले आहेत. घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये ४ ते ५ हजार लोकांचा समावेश होता. त्यातील २०० ते ३०० समाजकंटकांनी दगडफेक केली आणि माझे गर जाळलं. या समाजकंटकांकडे पेट्रोल बॉम्ब देखील होते.
प्रकाश सोळंके पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी बांधील आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पूर्ण विश्वास असल्याचं सोळंके म्हणाले.