महिला डॉक्टर आत्महत्या : आरोपी प्रशांत बनकरला अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे परिसरात मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास बनकरला अटक केली.
महिला डॉक्टर आत्महत्या : आरोपी प्रशांत बनकरला अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी
Published on

सातारा : फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी शनिवारी पहाटे पुण्यातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

या प्रकरणातील महिला डॉक्टर संपदा मुंडे ही बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होती. आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने बदने व बनकर यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची तत्काळ दखल घेत बदनेला निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली.

या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे परिसरात मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास बनकरला अटक केली. पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या. प्रशांत बनकरला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'मार्ड'कडून आत्महत्येचा काळ्या फिती लावून निषेध

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा 'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स' (मार्ड) तसेच 'सेंट्रल मार्ड' ने तीव्र निषेध केला आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी शनिवारी कर्तव्यावर असताना काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध केला. डॉ. मुंडे प्रकरणात तातडीने कारवाई केली गेली नाही तर असोसिएशन आंदोलन तीव्र करेल, असा इशारा 'सेंट्रल मार्ड'ने दिला आहे. आरोपीना तत्काळ करा आणि निःपक्ष चौकशीसाठी सीआयडी/एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी 'सेंट्रल मार्ड'ने केली आहे.

माजी खासदाराने दबाव आणल्याचा आरोप

आता या प्रकरणात एका माजी खासदाराचा कथित हात असल्याचाही आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वतः समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे. 'महाराष्ट्रात काही झाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातो. तसे इथे काही झाले की आमच्या नावाची बदनामी केली जाते', असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in