
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या अटकपूर्व अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. न्या. राजेश पाटील यांनी राज्य सरकारला याचिकेची प्रत देण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी सोमवारी निश्चित केली. तसेच न्यायालयाने तोपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला.
कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर न्या. राजेश पाटील यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकेची प्रत आपल्याला उपलब्ध झालेली नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याचिकेची प्रत सरकारी वकिलांना उपलब्ध करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी सोमवारी निश्चित केली.