
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि त्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करून फरार झालेला आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिनाभरापासून फरार झालेल्या कोरटकरला मंगळवारी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. शिवप्रेमींनी आक्रमक होऊन कोल्हापुरी चप्पल अन् चिल्लर उधळून त्याचा निषेध केला. तसेच काही शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केली. मंगळवारी सकाळी हे पथक कोरटकरला घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. कोरटकर याच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याने कोर्टाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोर्टाबाहेर जमलेल्या असंख्य शिवप्रेमींना चकवा देऊन कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले.
आरोपी महिन्याभरापासून फरार होता. त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी. कोरटकरने मोबाइलचा डेटा डिलिट केला, त्याचा तपास करायचा आहे, असे पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकरच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीसुद्धा सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोरटकरने ज्या मोबाइल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील सतीश घाग यांनी कोर्टात केला. मात्र, जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्या. एस. एस. तट यांनी हा निर्णय दिला.
कोरटकरवर चप्पल भिरकावली
दरम्यान, कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमा झाले होते. ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या कोरटकरला कोल्हापुरी चपलेने बदडण्याची योजना आखण्यात आली होती. कोरटकरला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयातून बाहेर आणताना एका व्यक्तीने त्याच्यावर चप्पल भिरकावली. मात्र, पोलिसांनी तत्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अखेर पोलिसांनी त्याला मागच्या दाराने न्यायालयात हजर केले.