'दुष्काळाच्या छायेत पूल पार्टी अयोग्य'; मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार नरेंद्र मेहतांवर टीका

राज्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असताना, मीरा-भाईंदरमधील ‘७११ क्लब’मध्ये प्रस्तावित पूल पार्टीवरून राजकीय वातावरण तापले आहे.
'दुष्काळाच्या छायेत पूल पार्टी अयोग्य'; मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार नरेंद्र मेहतांवर टीका
'दुष्काळाच्या छायेत पूल पार्टी अयोग्य'; मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार नरेंद्र मेहतांवर टीका
Published on

भाईंंदर : राज्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असताना, मीरा-भाईंदरमधील ‘७११ क्लब’मध्ये प्रस्तावित पूल पार्टीवरून राजकीय वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार टीका करत शिवसैनिकांना या कार्यक्रमाचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत असून अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत मीरा रोड येथील ‘७११ क्लब’मध्ये २७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूल पार्टीवर आक्षेप घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा प्रकार जनतेच्या भावनांशी विसंगत असल्याचे म्हटले आहे.

मीरा-भाईंदरमध्ये नागरिकांना दोन-दोन दिवस पाणी मिळत नसल्याचा उल्लेख करत सरनाईक यांनी, जनतेच्या थेंब-थेंब पाण्यासाठी शिवसेनेने यापूर्वी ‘टमरेल आंदोलन’ केले होते, असे सांगितले. शहरात पाणीटंचाई असताना हजारो लिटर पाण्याचा वापर करून पूल पार्टी आयोजित करणे ही असंवेदनशीलता असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, ‘७११ क्लब’मधील संबंधित कार्यक्रमाचे बुकिंग सुमारे चार महिन्यांपूर्वी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत करण्यात आले होते. त्यावेळी पावसाची परिस्थिती काय असेल, याचा अंदाज नव्हता. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन हे बुकिंग रद्द करण्यात आले असून संबंधित इव्हेंट कंपनीने समाजमाध्यमांवरील जाहिरातीही हटवल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरात अनेक महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषणांच्या संदर्भात गुन्हे दाखल होत आहेत. अशाच पूल पार्ट्यांमुळे गुन्हे घडणार नाही याची दखल सुद्धा पोलीस प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

पालिका प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी

मीरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून मिळणारे २१८ एमएलडी पाणी गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे मिळू शकले नसल्याचाही आरोप त्यांनी केला. जनतेच्या हक्काच्या पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या अशा कार्यक्रमांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अशा कार्यक्रमांमुळे समाजात चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळू नये, यासाठी पोलीस प्रशासनानेही दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in