

आशिष सिंग / मुंबई
अंमलबजावणी संचालनालयाने (इडी), राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांना भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पुढील आठवड्यात समन्स बजावले आहे.
विशेष म्हणजे २०२२ ते २०२४ दरम्यान 'घोस्ट अकाऊंट्स'द्वारे ७०.७४ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात याने १३४ हून अधिक बनावट खाती उघडून निधी वळवल्याचा संशय आहे. भक्तांकडून केवायसी कागदपत्रे घेऊन त्यांच्या नकळत खाती उघडण्यात आली आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेसह, नाशिकमधील आणखी एका संस्थेची चौकशी सुरू आहे.
तपासकर्त्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेतील एकूण चार बँक खाती ओळखली आहेत, ज्यामध्ये गेल्या काही वर्षांत सुमारे १.२० कोटी ते २.४० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही खाती खरात यांच्याशी जोडलेली आहेत. खरात याच्यावर १३४ हून अधिक संशयास्पद बनावट खात्यांचा वापर करून सहकारी बँकिंगच्या माध्यमातून निधी वळवल्याचा संशय आहे. या खात्यांमध्ये खरात यांना नामनिर्देशित (नॉमिनी) म्हणून दाखवले गेले होते आणि खाते उघडताना त्यांच्या मोबाईल नंबरचा वापर केला गेला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिभा चाकणकर यांनी हे आरोप फेटाळले असून, ही खाती बनावट असल्याचे आणि त्यांच्या नकळत त्यांच्या स्वाक्षऱ्या बनावट केल्या गेल्याचा दावा केला आहे.